मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:27 AM2019-03-16T06:27:43+5:302019-03-16T06:28:13+5:30
पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही होणार परिणाम
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर पायाभूत सुविधेसाठी शनिवार आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कुर्ला ते शीव या स्थानकांदरम्यान पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी माटुंगा ते कुर्ल्यादरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या आणि जलद मार्गावर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मेगाब्लॉक काळात शनिवारी रात्री १२ वाजून १८ मिनिटांची सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री १२ वाजून ३१ मिनिटांची सीएसएमटी ते कुर्ला लोकल, पहाटे ५ वाजून ५४ मिनिटांची कुर्ला ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११ वाजून १२ मिनिटांची कल्याण ते सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. अंबरनाथ ते सीएसएमटी ही रात्री १० वाजून १ मिनिटांची लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. यासह साईनगर शिर्डी ते सीएसएमटी, पंढरपूर ते सीएसएमटी, मेंगलोर ते सीएसएमटी एक्स्प्रेस रविवारी व सोमवारी दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येईल.
मुंबई मेल चेन्नई ते सीएसएमटी, कोणार्क एक्स्प्रेस भुवनेश्वर ते सीएसएमटी, अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, कन्याकुमारी ते सीएसएमटी एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस हैद्राबाद ते सीएसएमटी, गडग-सीएसएमटी एक्स्प्रेस, हावडा ते मुंबई मेल व्हाया नागपूर, नागपूर-सीएसएमटी नंदिग्राम एक्स्प्रेस या गाड्या उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर लोकलसेवा बंद
हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी, बेलापूर, पनवेल स्थानकाच्या दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही.
धिम्या लोकल धावणार जलद मार्गावरून
पश्मिच रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
आसनगाव ते कसारा पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावरील आसनगाव ते कसारापर्यंत रविवारी पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायरचे काम आणि पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी आसनगाव ते कसारा दरम्यान सकाळी १०.५० ते ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यानची दोन्ही दिशेकडील मार्गावरील लोकलसेवा बंद असेल.
सकाळी ९.४१ची, तसेच सकाळी १०.१६ची सीएसएमटी ते कसारा लोकल आसनगावपर्यंत चालविण्यात येईल. सकाळी ११.१२ आणि दुपारी १२.१९ वाजताची कसारा ते सीएसएमटी लोकल आसनगाव स्थानकातून अनुक्रमे सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून १९ मिनिटांनी चालविण्यात येईल.
रविवारी मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाड मार्गे धावेल. ब्लॉकदरम्यान डाउन मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्या आसनगाव स्थानकात १० ते ३० मिनिटे तर अप मार्गावरील गाड्या कसारा स्थानकात २० ते ९० मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
कर्जत स्थानकात झाड तोडण्यासाठी उद्या ब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील झाड तोडण्यासाठी सकाळी १०.४० ते ते दुपारी १.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सकाळी १० वाजून ४८ मिनिटांची, दुपारी १२ वाजून ५ मिनिटांची ठाणे ते कर्जत लोकल, दुपारी १ वाजून २७ मिनिटांची कर्जत ते ठाणे लोकल, दुपारी १ वाजून ५७ मिनिटांची कर्जत ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे.
सकाळी ९ वाजून १ मिनिटांची, सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांची, सकाळी १० वाजून ३६ मिनिटांची आणि सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल भिवपुरी स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. याचप्रमाणे, सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची, सकाळी ११.१९ वाजताची, दुपारी १२.२१ वाजताची आणि दुपारी १ वाजताची कर्जत ते सीएसएमटीची भिवपुरी स्थानकावरून चालविण्यात येईल.