लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार व रविवार (१० व ११ एप्रिल राेजी) कडक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी, हे दोन दिवस प्रवासी संख्या घटली. त्यामुळे परळ बस स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसेसची संख्याही कमी करण्यात आली होती. याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला. या दोन दिवसात ३४ बसेस ५,९१० हजार किमी धावल्या. यातून महामंडळाला केवळ एक लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न झाले.
परळ आगाराला लॉकडाऊनपूर्वी लाख रुपये दररोज उत्पन्न मिळत होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लावले. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली. त्यामुळे आगारातून निम्म्या बस धावू लागल्या. एसटी बसेसची संख्या घटल्याने उत्पन्न घटले. मागील काही दिवसांपासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत रविवार व शनिवार कडक निर्बंध असल्याने अनेक प्रवाशांनी बाहेरगावी जाणे टाळले. त्यामुळे प्रवासी संख्या घटली. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत फेऱ्याही कमी केल्या.
कोरोना प्रादुर्भावामुळे वीकेंड लाॅकडाऊनला एसटी महामंडळाचे नुकसान झाले आहे. त्यातच ‘ब्रेक द चेन’चा मोठा फटका बसला असून, या दोन दिवस गाड्या रिकाम्याच धावल्या. असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
* ११ लाखांचा फटका
परळ आगाराला एका दिवसाला सहा लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळत होते. दोन दिवसांत फेऱ्या घटल्याने दोन दिवसांमध्ये एसटी महामंडळाला ११ लाखांचा तोटा झाला. तर दोन दिवसांत केवळ एक लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
एकूण बसेस ९७
धावलेल्या बसेस ३४
फेऱ्या ४२
किलोमीटर ५,९१०
उत्पन्न १,३६,०००
...........................