Join us

जातवैधतेसाठी दोन दिवसांची मुदत, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:25 AM

बी. इलेक्ट्रिकल, बी. आर्किटेक्चर, बी. टेक्नॉलॉजी, बी. फार्मसी आणि फार्म डी. या पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या कॅप राउंड १ अंतर्गत प्रवेश सुरू

मुंबई : बी. इलेक्ट्रिकल, बी. आर्किटेक्चर, बी. टेक्नॉलॉजी, बी. फार्मसी आणि फार्म डी. या पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाच्या कॅप राउंड १ अंतर्गत प्रवेश सुरू असून, जात वैधतेसाठी विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी दोन दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जात वैधता नसल्यामुळे प्रवेश रखडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी तंत्र शिक्षण संचालनालाच्या अधिपत्याखाली व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. या प्रवेशासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करू नये, असे आदेश शासनाने सीईटी कक्षाला दिले होते. ही सूट प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होण्यापर्यंतच होती. मात्र, अद्यापही बहुतांश विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही.बी. इलेक्ट्रिकल, बी. आर्किटेक्चर, बी. टेक्नॉलॉजी या प्रवेशासाठी १६ जुलै, तर बी. फार्मसी आणि फार्म डी. या प्रवेशासाठी १७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत आहे. या संदर्भात डीटीईने सूचना केल्या असून, दोन दिवसात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवगार्तून प्रवेश घ्यावा लागेल अन्यथा प्रवेश रद्द होईल, असे डीटीईतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, दोन दिवसांत प्रमाणपत्र मिळणे अवघड असल्याने विद्यार्थी नाराज होते. प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती ग्राह्य धरत प्रवगार्तूनच प्रवेश निश्चिती द्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत होते. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सवलत मिळण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सर्व तहसिल कार्यालयाना दोन दिवसांत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन दिवस इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रियाही पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १६ जुलै होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळण्यात अडचणी येत होत्या त्यांना दिलासा मिळाला आहे.