दोन दिवस कोरडे, नंतर कोकणात मुसळधार; जुलैमध्ये मान्सून सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 06:48 AM2019-06-27T06:48:46+5:302019-06-27T06:48:49+5:30
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून मंगळवारीच दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र म्हणावा तसा पाऊस अद्याप कुठेच पडलेला नाही.
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून मंगळवारीच दाखल झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र म्हणावा तसा पाऊस अद्याप कुठेच पडलेला नाही. विशेषत: मुंबईकडे पावसाने पाठच फिरविली असून, पुढील दोन दिवस तरी पावसासाठी कुठेच अनुकूल वातावरण तयार होणार नाही. परिणामी, पुढचे दोन दिवस कोरडेच राहणार असून, त्यानंतर मात्र पाऊस पडण्यासाठी हवामान अनुकूल होईल आणि कोकणात मुसळधार पावसास सुरुवात होईल. तर राज्यात मान्सून अधिक वेगाने सक्रिय होण्यासाठी जुलै महिना उजाडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.
मुंबईसाठी अंदाज
२७ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
२८ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मान्सून बुधवारी मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत, उत्तर अरबी समुद्र व् दक्षिण गुजरातच्या काही भागांत, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांत दाखल झाला आहे.
कोकण, गोव्यातील अनेक ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची रिमझिम होती. २७ ते २८ जून या काळात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, २९ ते ३० जून या कालावधीत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.