कोर्टाचा दणका! गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:01 AM2022-04-12T06:01:53+5:302022-04-12T06:02:06+5:30
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन समोर आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचा दावा सरकारी पक्षाने केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई :
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन समोर आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचा दावा सरकारी पक्षाने केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांच्याबद्दल अनेक गौप्यस्फोट केले, तसेच हे आंदोलन पूर्वनियोजित कट आहे. हल्ल्याच्या आधी एक विशेष बैठकही झाली होती. तसेच ‘सावधान शरद... सावधान शरद...’ अशा आशयाचे बॅनरही बनवल्याचे त्यांनी गिरगाव न्यायालयाला सांगितले. सदावर्तेंचा एक फोन मार्च २०२२पासून सापडत नसून, त्यात महत्त्वाच्या गोष्टी दडल्याने तो मोबाइल व सीमकार्ड जप्त करायचे आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जतन करून संग्रहालय करण्यासाठी जमविलेल्या निधीत झालेल्या अपहारप्रकरणी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या या दोघांनाही सोमवारी न्यायालयाने दणका दिला. गिरगाव न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर ॲड. सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. तर सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. सोमय्या कुठे लपलेत, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नागपूरची ‘ती’ व्यक्ती नेमकी कोण?
- सदावर्ते हे नागपूरमध्ये कोणाच्या तरी सतत संपर्कात होते. त्या दिवशी सकाळी ११.३५ मिनिटांनी सदावर्तेंच्या फोनवरून नागपूरला फोन गेला. n दुपारी १.३८ वाजता नागपूरच्या क्रमांकावरून संदेश आला, ‘पत्रकारांना पाठवा.’ पावणेतीनच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक माध्यमांना कळविले अशी माहिती घरत यांनी दिली. यामुळे नागपूरची ती व्यक्ती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.