दोन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:32 AM2018-07-09T06:32:46+5:302018-07-09T06:33:05+5:30

राज्यात मागील तीन दिवसांत मुंबईसह कोकण व पूर्व विदर्भात दमदार पाऊस झाल्यानंतर आता दोन दिवस दक्षिण मध्य, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

Two days of heavy rain, the forecast of the weather department | दोन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज

दोन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज

googlenewsNext

मुंबई - राज्यात मागील तीन दिवसांत मुंबईसह कोकण व पूर्व विदर्भात दमदार पाऊस झाल्यानंतर आता दोन दिवस दक्षिण मध्य, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल. त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात सोमवारी जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मंगळवारी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील. मराठवाड्यात सोमवारी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
माथेरानमध्ये दरड कोसळली
मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले. सततच्या पावसामुळे रविवारी सकाळी माथेरानमध्ये दरड कोसळल्याने जवळपास चार तास माथेरान घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. शनिवारच्या तुलनेमध्ये रविवारी रायगडमधील प्रमुख नद्यांची धोक्याची पातळी खाली आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.
१५ तासांत १५० मिलीमीटर पाऊस
मुंबई शहर-उपनगरात शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून रविवारी दुपारपर्यंतच्या पंधरा तासांत दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद
झाली आहे.

मुंबई, रायगडमध्ये कोसळधारा


मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारीही मुंबई-उपनगरासह रायगड जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. ठाण्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारच्या पावसाने मुंबई शहरासह उपनगरातील सखल भागांत पाणी साचले आणि येथील रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला. पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल किमान १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. रस्ते मार्गांवर ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.

उरणमध्ये तरु णाचा मृत्यू
उरण तालुक्यातील केगाव तलावात विराज पाटील (३०) हा तरु ण बुडाला. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांसह मोरा सागरी पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केल्यानंतर तीन तासांत मृतदेह हाती लागला. विराज मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यास गेला होता. खेळून झाल्यानंतर तो मित्रांसोबत केगाव तलावाजवळ आला होता. फुटबॉल तलावात पडल्याने तो काढण्यासाठी मित्रांसोबत विराज तलावात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.

शिवथरघळ धबधब्यात पर्यटक बुडाला
रविवारी सुटीनिमित्त पुणे येथून १३ पर्यटक शिवथरघळ येथे धबधब्यावर आले होते. यामधील उत्तम यशवंत हरवले (५०, रा. पुणे) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाणे जिल्हा पूर्वपदावर
ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला असून विस्कळीत झालेले जनजीवन रुळांवर येताना दिसले. नदीनाल्यांच्या किनारी असणाऱ्या गावांतील काही घरांत पाणी शिरले होते, ते पाणी ओसरले.

गाढी नदी परिसर पूरसदृश
मुसळधार पावसाने पनवेलमधील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गाढी नदीने दुसºया दिवशीही धोक्याची पातळी गाठली होती.

Web Title: Two days of heavy rain, the forecast of the weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.