मुंबई - मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी पहिल्याच पावसाने झोडपले असताना आता शनिवारसह रविवारीही मुंबई शहर, उपनगरात तुरळक ठिकाणी जोरदार सरींसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.भिंती पडल्या : शहरात २, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ६ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या.शॉर्टसर्किटच्या घटना : शहरात ६, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.झाडे कोसळली : शहरात ११, पूर्व उपनगरात १८, पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५३ ठिकाणी झाडे/ फांद्या पडण्याच्या तक्रारी आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या.येथे तुंबले पाणी : कुलाबा मार्केट, अंजिरवाडी-माझगाव, हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४, माटुंगा लेबर कॅम्प, चेंबूर पोस्टल कॉलनी, गोवंडी नीलम जंक्शन, साकीनाका, कुर्ला, मानखुर्द-घाटकोपर लिंक रोड, गोवंडी चित्ता कॅम्प, ट्रॉम्बे सुराना रुग्णालय, कांजूरमार्ग हुमा मॉल, अंधेरी सब-वे, मिलन सब-वे, मालाड सब-वे, वांद्रे नॅशनल कॉलेज, जोगेश्वरी-अंधेरी लिंक रोड.सर्व ठिकाणच्या पाण्याचा निचरा उदंचन पंपाच्या मदतीने;शिवाय मॅनहोलची झाकणे उघडून मनुष्यबळाच्या साहाय्याने करण्यात आला.भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी स्थानकांदरम्यान रूळ पाण्याखालीमुंबई : पहिल्या पावसातच लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने या वर्षी रुळावर पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. मात्र पहिल्याच पावसाने तो खोटा ठरविला, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.मध्य रेल्वे मार्गात पाणी साचू नये म्हणून रेल्वे प्रशासानाने या वर्षी ७९ पंप मशीन बसविले. मात्र तरीदेखील पाणी साचले. भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले. अनेक एक्स्प्रेसही ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रत्येक स्थानकावरील फलाट, पादचारी पुलावर रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. रूळ, सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरू होती. त्यामुळे लोकलसेवेवर परिणाम झाला नाही. फक्त काही मेल, एक्स्प्रेसवर परिणाम झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.सायंकाळी पाचपर्यंत मध्य रेल्वेच्या २१ लोकल रद्दशुक्रवारी मुसळधार पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर परिणाम झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील १४ लोकल, हार्बर मार्गावरील ७ लोकल रद्द करण्यात आल्या. १० ते २० मिनिटे लोकल उशिराने इच्छितस्थळी पोहोचत होत्या, अशी माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. कल्याण दिशेकडे जाणाºया लोकल रद्द केल्याने येथील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाबाहेर खासगी कंपनीद्वारे नाल्यात अतिरिक्त भराव टाकल्यामुळे कांजूरमार्ग आणि विक्रोळीदरम्यान रुळांवर पाणी साचले. हा नाला पूर्व-पश्चिम वाहत असल्याने पाणी जास्त प्रमाणात भरले. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून कुर्ला ते सीएसएमटी येथून विशेष लोकल चालविण्यात आल्या.पश्चिम रेल्वे मार्गावरील १०५ लोकल उशिरानेशुक्रवारी मुसळधार पडलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील १०५ लोकल उशिराने धावत होत्या, अशी माहिती पश्चिम रेल्वे अधिकाºयांनी दिली. तर, या मार्गावरील १२ लोकल रद्द करण्यात आल्या.
मुंबईत दोन दिवस जोर‘धार’; मुसळधार पावसाचा इशारा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 6:04 AM