लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्री तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली असतानाच, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातही झालेल्या पावसानंतर आता पुढील ४८ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ ते २६ मे दरम्यान कोकण आणि गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी लागत असल्याने तापमानात फरक नोंदविला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.