लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : म्युकरमायकोसिसमुळे कल्याण-डोंबिवलीत दोन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. बाजीराव काटकर (६९) आणि तुकाराम भोईर (३८) अशी मृतांची नावे आहेत.
बाजीराव काटकर हे डोंबिवलीतील दावडी परिसरात, तर तुकाराम भोईर हे कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ येथे राहत होते. काटकर यांना २५ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांना म्युकरमायकोसिस झाल्याने खासगी रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले. म्युकरमायकोसिसमुळे त्यांचा एक डोळा बाधित झाला होता. याच आजाराने त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना चांगले उपचार मिळाले नसल्याचा आरोप त्यांचा मुलगा वैभव याने केला आहे. त्यांच्या मृत्यूविषयी रुग्णालय प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला. केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी म्युकरमायकोसिसचे सहा रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.