कनकरत्नम यांच्या निवृत्तीमुळे एक पद रिक्त
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलातील दोन महासंचालक निवृत्त होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत या दर्जाच्या रिक्त पदांची संख्या तीन होणार आहे. राज्य विशेष सुरक्षा महामंडळाचे कार्यकारी संचालक डी.कनकरत्नम निवृत्त झाल्याने एक पद रिक्त आहे. त्यांचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात होमगार्डचे महासमदेशक संजय पाण्डेय यांच्याकडे आहे.
महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी नव्या वर्षात ३१ जानेवारीला तर सुधारसेवा विभागाचे संचालक सुरेंद्र पाण्डेय फेब्रुवारीत निवृत्त होत आहेत.
राज्यात डीजीच्या दर्जाची आठ पदे पूर्वी कार्यरत होती. राज्य सरकारने होमगार्डशी संलग्न असलेल्या नागरी सुरक्षा विभाग स्वतंत्र करीत, त्या ठिकाणी रश्मी शुक्ला यांची पदोन्नती केली. त्यामुळे डीजीची ९ पदे निर्माण झाली.
मात्र, ३० नोव्हेंबरला डी.कनकरत्नम निवृत्त झाल्याने सद्या एक पद रिक्त झाले आहे. त्यांच्यानंतर आता १९८७च्या आयपीएस बॅचचे ज्येष्ठ अधिकारी बिपीन बिहारी जानेवारी अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यानंतर, पुढच्या महिन्यात सुरेंद्र पाण्डेय यांचा नंबर आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी १९८८ बॅचचे आयपीएस अप्पर महासंचालक डॉ.के व्यकटेशम यांना पदोन्नती द्यावी लागणार आहे, तर पुढील वर्षात रिक्त होणाऱ्या जागांसाठी १९८९च्या आयपीएस बॅचचे एडीजी संदीप बिष्णाेई व ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पदोन्नती दिली जाईल.
* डीजींना केंद्रातून सिग्नल मिळेना
पोलीस दलाचे प्रमुख सुबोध जायसवाल हे प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. राज्य सरकारनेही त्याच्या प्रस्तावाला तातडीने संमती दिली आहे. मात्र, केंद्राने अद्याप त्यांची मागणी केलेली नाही. नव्या वर्षातच त्याबाबत विचार केला जाणार असल्याचे समजते.
* या आठवड्यात पदाेन्नतीवर शिक्कामाेर्तब!
राज्यातील १०२ पोलीस निरीक्षकांच्या बढतीची यादी तयार आहे. मात्र, गेल्या आठवड्यात डीजीपी जायसवाल रजेवर असल्याने पदोन्नती समितीची बैठक झाली नाही. या आठवड्यात ती होऊन पदोन्नतीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.