सौदी सरकारचा निर्णय; हजच्या परवानगीबाबतचा निर्णय लांबणीवर
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या हज यात्रेसाठी परदेशी नागरिकांना परवानगी देण्याबाबत सौदी अरेबिया सरकारने अद्याप निर्णय घेतला नसला तरी त्यासाठी इच्छुकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य केले आहे. लस न घेणाऱ्यांना सौदीत प्रवेश दिला जाणार नाही.
मक्का-मदिना येथे होणाऱ्या यात्रेचा मुख्य विधी यावर्षी जुलैच्या अखेरीस होत आहे. त्यासाठी भारतीयांसह परदेशी नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही, याबद्दल पुढील महिन्यात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी देशातील हज कमिटीमार्फत यात्रेला जाण्यासाठी ५८ हजार अर्ज आले. मात्र सौदी सरकारकडून त्याबाबत निर्णय झाला नसल्याने त्यांची निश्चिती व पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही.
इस्लाम धर्मीयांत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी दरवर्षी भारतातून सुमारे पावणेदोन लाखांवर भाविक सहभागी होत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी सौदी सरकारने परदेशी भाविकांना निर्बंध घालण्यात आले होते. यावर्षीच्या हजसाठी कमिटीने गेल्या नोव्हेंबरपासून इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. १० जानेवारीपर्यंत ५८ हजार जणांनी अर्ज केले. दरम्यानच्या काळात जगभरात पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने यंदा हज परवानगीबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. काेराेना संसर्ग कमी झाल्यास विशेष खबरदारी बाळगून परवानगी दिली जाईल. मात्र लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हज यात्रेला मंजुरी मिळाल्यास राज्यातून, मुंबईतून भाविकांसाठी फ्लाइट्स जाणार आहेत. एका भविकाला सरासरी ३.३० लाख खर्च येईल.
* निर्धारित मुदतीत लस घ्यावी
यंदा हज आणि उमराह यात्रेबाबत सौदीकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले असतील, त्यांनाच पाठविले जाईल, त्यामुळे अर्ज केलेल्यांनी निर्धारित मुदतीत लस घ्यावी.
- डॉ. मकसूद अहमद खान,
मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया
............................................