Join us  

दोन अभियंते गजाआड

By admin | Published: July 08, 2016 2:34 AM

रस्ते घोटाळा प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी पालिकेच्या दोन मुख्य अभियंत्यांना अटक केली आहे. या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत २२ जणांना अटक झाली आहे. आज अटक झालेल्या अभियंत्यांमध्ये

मुंबई : रस्ते घोटाळा प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी पालिकेच्या दोन मुख्य अभियंत्यांना अटक केली आहे. या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत २२ जणांना अटक झाली आहे. आज अटक झालेल्या अभियंत्यांमध्ये अशोक पवार आणि उदय मुरूडकर यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना ११ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. महानगरपालिकेच्या ३५२ कोटींच्या रस्ते घोटाळा प्रकरणात आॅडिट कंपनीच्या १० लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर कंत्राट कंपनीच्या ठेकेदारांसह तेथील सुपरवायझर आणि साइट इंजिनीअरची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. गुरुवारी आझाद मैदान पोलिसांनी पालिकेच्या दक्षता विभागातील मुख्य अभियंता उदय नामदेव मुरूडकर (५४) आणि रस्ते आणि वाहतूक विभागाचे अशोक पवार (५७) या दोघांना अटक केली. रस्ते घोटाळ्यांमध्ये या दोघांचाही समान सहभाग असल्याचे समोर आले. यामध्ये आणखी काही पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)कंत्राटदार मोकाटच...पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर.के. मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्टर प्रा.लि., जे. कुमार, के. आर. कन्स्ट्रक्शन आणि आर.पी.एस. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत या कंत्राटदारांना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. मात्र ते गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली.