दक्षिण मुंबईत १०० कोटींना दोन फ्लॅट, यंदाचा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:59 AM2020-07-16T03:59:31+5:302020-07-16T06:14:19+5:30
अनुराग जैन हे एड्यूरन्स टेक्नॉलॉजी या प्रख्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. जगातील श्रीमंतांच्या फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत ते ८४ व्या क्रमांकावर आहेत.
मुंबई : दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या वस्तीतल्या कार्माइकल रेसिडेन्सीमधील दोन घरांसाठी तब्बल १०० कोटी रुपये मोजण्यात आले. सहा हजार ३७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे दोन फ्लॅट प्रसिद्ध उद्योगपती अनुराग जैन यांनी विकत घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. प्रति चौरस फुटासाठी त्यांनी एक लाख ५७ हजार रुपये दिले असून मुंबईतील या वर्षातला हा सर्वांत मोठा गृहखरेदीचा व्यवहार असल्याचे सांगितले जात आहे.
अनुराग जैन हे एड्यूरन्स टेक्नॉलॉजी या प्रख्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. जगातील श्रीमंतांच्या फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत ते ८४ व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी कार्माइकल रोडवरील २२ मजली इमारतीतल्या लक्झरी घरांसाठी १०० कोटी रुपये दिले. या व्यवहारापोटी राज्य सरकारला ५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. प्रत्येक फ्लॅट ३१८५ चौरस फुटांचा आहे. या दोन फ्लॅटसाठी आठ कारचे पार्किंगही आहे. काही दिवसांपूर्वी अॅनी बेझंट मार्गावरील शहरातील उच्चभ्रूंच्या वस्तीमध्ये दोन सुपर लक्झरी फ्लॅटची ७६ कोटी ३० लाख रुपयांना विक्री झाली होती. दक्षिण मुंबईतला व्यवहार त्यापेक्षाही जास्त किमतीचा ठरला आहे.
अॅनी बेझंट मार्गावरील
प्रति चौरस फूट दर हा ६२ हजार रुपये होता. तर, कार्माइकल रोडवरील व्यवहार दुपटीपेक्षा जास्त दराने
झाला आहे. कोरोना संकटामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत असून आपण बांधलेली घरे कशी
विकली जाणार, या चिंतेने या व्यावसायिकांना घेरले आहे. या परिस्थितीत उच्चभ्रूंच्या इमारतींमधील घरांसाठी होणारे हे व्यवहार लक्षवेधी ठरत आहेत.
मंदीचे मळभ हटू लागले
कोरोनाची साथ, लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट व्यवहारांना खीळ बसल्यासारखी स्थिती मध्यंतरी होती. तयार असलेली घरे विकली जातील की नाही, अशी चिंता बांधकाम व्यावसायिकांना होती. हे मंदीचे मळभ हटू लागल्याचे सुचिन्ह या व्यवहारातून दिसून आले.