बीकेसी, वांद्रे-वरळी सी-लिंक दरम्यान दोन उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:36 AM2020-01-01T02:36:16+5:302020-01-01T02:36:28+5:30
आतापर्यंत ५१ टक्के काम पूर्ण; वाहतूककोंडी सुटणार
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या ठिकाणी उड्डाणपुलांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे़ पुढच्या वर्षी हे दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. बीकेसी ते वांद्रे-वरळी सी-लिंक आणि वांद्रे-वरळी सी-लिंक ते बीकेसी असे दोन उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. आतापर्यंत ५१ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले असून हे पूल सुरू झाल्यावर येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
बीकेसी ते वांद्रे-वरळी सी-लिंक दरम्यान बांधण्यात येत असलेल्या दोन पुलांची लांबी १८८८ मीटर आहे. धारावी ते सी-लिंक दरम्यानची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ३०० मीटर लांबीचा आणि १२ फूट रुंदीचा मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. तर बीकेसी ते चुनाभट्टी दरम्यानचा उड्डाणपूल सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासह एमएमआरडीए बीकेसी आणि शीव-चेंबूर लिंक रोडला जोडणार असून या दोन मार्गांच्या बांधकामासाठी ४९९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
१.३ किमीचा हा उन्नत मार्ग एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपुलापर्यंत असणार असून ३.८९ किमीचा उन्नत मार्ग हा कुर्ला (कपाडियानगर) ते वाकोलापर्यंत असणार असून एससीएलआर जंक्शनला जोडणार आहे. यामुळे बीकेसीतील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
पुढील वर्षी तीन उन्नत मार्ग पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर मानकोली आणि राजनोली पुलाच्या डाव्या बाजूकडील लेनचे काम पूर्ण करण्यात येणार असून वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे. कल्याण-भिवंडी दरम्यानचा तिसरा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.