Join us

दोघा परप्रांतीयांना शस्त्रांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परराज्यातून मुंबईत शस्त्रास्त्रे विकण्यासाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परराज्यातून मुंबईत शस्त्रास्त्रे विकण्यासाठी आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी सकाळी अटक केली. मनोजकुमार गोपाळकुमार वैष्णव व करन चेतन दास अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून ७ गावठी रिव्हॉल्व्हर, १६ जिवंत काडतुसे जप्त केली. दादर येथील प्रीतम हॉटेल जवळ त्यांना संशयास्पद अवस्थेत थांबले असताना ही कारवाई करण्यात आली.

दोघेजण मूळचे राजस्थानचे असून इंदूरमधून त्यांनी ही शस्त्रास्त्रे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेजण मुंबईत शस्त्रे विकण्यासाठी दादर येथे येणार आहेत, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक सुनील पोवार यांना मिळाली, त्यानुसार प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार परिसरात पहाटेपासून पाळत ठेवली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास मनोजकुमार वैष्णव व करन दास हे दादर ब्रीज जवळून रेल्वे स्टेशनकडे येत असताना प्रीतम हॉटेलजवळ आले असताना खबऱ्याने दोघांच्याबद्दल खात्री दिल्यानंतर ‘एईसी’च्या पथकाने झडप घालून त्यांना पकडले. झडतीमध्ये त्यांच्याकडे ७ गावठी पिस्तुले,१६ जिवंत काडतुसे आढळून आली, त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्यांनी हत्यारे कोठून व कोणासाठी आणली होती, ती मागविण्यामागे त्यांचा उद्देश काय होता, यापूर्वी कोणाकडे तस्करी केली आहे का, याबाबत तपास केला जात असल्याचे निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.