दुचाकीवरील दोन मित्रांचा विचित्र अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:08 AM2021-02-13T04:08:08+5:302021-02-13T04:08:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : येथील पूर्वेकडील भागात राहणारे योगेश सांगळे आणि मुकेश राय हे दोघे मित्र दुचाकीने कल्याण ...

Two friends on a two-wheeler die in a bizarre accident | दुचाकीवरील दोन मित्रांचा विचित्र अपघातात मृत्यू

दुचाकीवरील दोन मित्रांचा विचित्र अपघातात मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : येथील पूर्वेकडील भागात राहणारे योगेश सांगळे आणि मुकेश राय हे दोघे मित्र दुचाकीने कल्याण रेल्वेस्थानकाकडे जात असताना, त्याठिकाणी बॅरिकेड‌्सऐवजी लावण्यात आलेल्या नायलॉन दोरीचा त्यांच्या गळ्याला फास बसला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० ते ३ वाजेदरम्यान घडली. या घटनेची नोंद कोळसेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मुकेश हा कल्याण पूर्वभागातील जिम्मीबाग परिसरात, तर योगेश हा जगतापवाडीत राहत होता. गुरुवारी योगेशला कामावर जायचे होते म्हणून मुकेश त्याला आपल्या दुचाकीवर बसवून कल्याण रेल्वेस्थानकाकडे निघाला. जलद लोकल ७ नंबर फलाटावर येत असल्याने त्या फलाटाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून ते दोघेही दुचाकीने जात होते. याचदरम्यान रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेड‌्सऐवजी लावण्यात आलेली नायलॉन दोरी मुकेशच्या गळ्यात अडकली. यामध्ये त्याचा गळा कापला गेल्याने तो खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मुकेशच्या पाठीमागे बसलेला योगेशदेखील दुचाकीवरून पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचाही मृत्यू झाला.

दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

मुकेशचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते, तर योगेशच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची लहान मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. बॅरिकेड‌्स‌ऐवजी बांधलेली नायलॉनची दोरी न दिसल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी जे कोणी दोषी आहेत, त्यांच्याविरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुकेशचा भाऊ सुनील यांनी केली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, त्याला नेमके कोण जबाबदार आहे, याचा तपास सुरू असल्याचे कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Two friends on a two-wheeler die in a bizarre accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.