- दीपक भातुसे
Nashik Graduate Constituency Election: राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तसेच सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने पक्षानं त्यांच्यावर रविवारी निलंबनाची कारवाई केली.
सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. सत्यजीत तांबे यांना विधानपरिषद निवडणुकीत पाठिंबा देऊन विषय संपवावा, असं काँग्रेसमधील एका गटाचे मत आहे. तर सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करावी, अशी एका गटाची मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणी केली होती. पण, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तसेच, फॉर्म भरल्यानंतर भाजपालाही समर्थन देण्याची विनंती केली. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यानंतर आता हायकमांडनं रविवारी पत्रक जारी करत सुधीर तांबेंना निलंबित केलं.
सुधीर तांबे यांच्या निलंबनाबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पत्र काढलं आहे. त्यामुळे शिस्तभंगाचं आणि शिस्तपालनाचा प्रश्न दिल्लीतील वरिष्ठ यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाबाबत जो काही निर्णय आहे, तो दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, अशी माहिती महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
न्यायावर माझा विश्वास- सुधीर तांबे
माझ्या संदर्भात काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास असल्याचं सुधीर तांबे यांनी म्हटलं आहे.