Join us

बोरीवलीत आजोबांनी केले चोरांशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:00 AM

शतपावली करून सोसायटीच्या गेटकडे उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या आजोबांना दोन लुटारूंनी शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३० मे रोजी बोरीवलीत घडली. मात्र आजोबांनीही चोरांशी दोन हात करीत त्यांचा पाठलाग केला.

मुंबई : शतपावली करून सोसायटीच्या गेटकडे उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या आजोबांना दोन लुटारूंनी शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३० मे रोजी बोरीवलीत घडली. मात्र आजोबांनीही चोरांशी दोन हात करीत त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत त्यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. मात्र ते न घाबरता त्यांच्या मागावर होते. अखेर लुटारूंनी त्यांच्या हातातील ब्रेसलेट घेऊन पळ काढला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बोरीवली पश्चिमेकडील परिसरात पुंडलिक आत्माराम सावंत (६५) हे कुटुंबासह राहतात. ते शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लेखा परीक्षणाचा व्यवसाय करतात. ३० मे रोजी रात्री सव्वा आठ ते साडे नऊ दरम्यान झेन गार्डन ते डी. मार्ट पोलीस चौकीकडे नेहमीप्रमाणे शतपावली करत होते. रात्री साडे नऊच्या सुमारास ते सोसायटीच्या गेटकडे आले. त्याचदरम्यान दोन तरुणांनी त्यांना चाकू दाखवून घाबरवले. त्यानंतर त्यांच्या हातातील ब्रेसलेट ओढून पळण्याचा प्रयत्न करू लागले. आजोबा त्यांच्यामागे चोर चोर करत धावले. त्यांनी पाठून एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एकाने जवळील चाकूने त्यांच्यावर वार केले. मात्र तरीही आजोबांनी चोरांचा पाठलाग सुरूच ठेवला. त्या वेळी चोरांनी त्यांच्या छातीवर मारून त्यांना खाली पाडले. पण ते पुन्हा उभे राहिले आणि चोरांचा पाठलाग करू लागले. तोपर्यंत नागरिक जमू लागले.आजोबा जखमी अवस्थेतही चोरांना पकडण्यासाठी जिवाची पर्वा न करता त्यांच्यामागे धावत गेले. स्थानिकांनादेखील त्यांनी चोरांना पकडण्याची विनंती केली. मात्र तोपर्यंत दोघेही चोर लिंक रोडने बोरीवलीच्या दिशेने पळून गेले. त्यामुळे आजोबांनी एमएचबी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. आजोबांच्या धाडसामुळे चोरांच्या हाती जास्त लागले नाही. मात्र यामध्ये आजोबांचे दोन तोळ्यांचेब्रेसलेट चोरीस गेले. या प्रकरणी एमएचबी पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :गुन्हा