Join us

भावाच्याच दुकानात लाखोंचा डल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 11:00 AM

दोन लोकांनी तोंडावर स्प्रे मारून मला बेशुद्ध केले आणि दुकानातील लाखोंचे दागिने लंपास करुन पळ काढला असा बनाव करणाऱ्या कमलेश लोहार नामक सोनारासह चौघांच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या.

ठळक मुद्देअंधेरीत सुभाषनगर परिसरात महावीर ज्वेलरचे दुकान असून देवीलाल लोहार हे त्याचे मालक आहेत.गुंगीचे औषध नाकावर फवारत दुकानातील ९ किलो ९०३ ग्रॅम सोने लुटून नेले अशी तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. चोरीला गेलेल्या एकुण मुद्देमालापैकी ७ किलो १४ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

मुंबई: दोन लोकांनी तोंडावर स्प्रे मारून मला बेशुद्ध केले आणि दुकानातील लाखोंचे दागिने लंपास करुन पळ काढला असा बनाव करणाऱ्या कमलेश लोहार नामक सोनारासह चौघांच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या. कोणताही पुरावा नसताना अत्यंत शिताफीने त्यांनी याप्रकरणाचा खुलासा केल्याने खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश मिळाले.अंधेरीत सुभाषनगर परिसरात महावीर ज्वेलरचे दुकान असून देवीलाल लोहार हे त्याचे मालक आहेत. ४ मे रोजी त्यांचा मामेभाऊ कमलेश आणि त्याचा मित्र दिनेश पुरबिया हे दुकानात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आल्या. त्यांनी गुंगीचे औषध नाकावर फवारत दुकानातील ९ किलो ९०३ ग्रॅम सोने लुटून नेले अशी तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केदारी पवार यांनी तपास सुरू केला.

कमलेश याचे बोलणे वागणे तसेच त्याच्या देहबोलीतून तो काहीतरी लपवत असल्याचा संशय त्याच्यावर पोलिसांना होता. त्यानुसार त्याच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवुन होते. तसेच त्याच्या जबाबातही बरीच तफावत होती. त्यामुळे अखेर त्यांनी कमलेश , त्याचे वडील सोहनलाल आणि भाऊ राकेश लोहार यांना वेगवेगळे घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये कमलेशनेच मित्र पुरबिया याच्यासोबत मिळुन ही चोरी केल्याची कबूली दिली. त्यानुसार कमलेशसह चौघांनाही अटक करण्यात आले. चोरीचे सोने त्याने मित्रासोबत राजस्थानला पाठवून दिले होते. गोरेगावमधील वडिलांचे सोन्याचे दुकान नीट चालत नव्हते त्यामुळे मामाचा मुलगा देवीलाल याच्या दुकानात चोरी करण्याचे त्याने ठरविले. देवीलाल एका लग्नासाठी राजस्थानला गेल्याने दुकानाची जबाबदारी त्यांनी कमलेशवर दिली. त्याचाच त्यांनी फायदा उठविला. चोरीला गेलेल्या एकुण मुद्देमालापैकी ७ किलो १४ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.कानुन के लंबे हाथ...

कमलेश याने लुटलेले सोने पुरबीयसोबत पाठवून दिले. पोलीस प्रकरण शांत झाले की नफा वाटुन घेऊ असे आश्वासन त्याने पुरबियाला दिले होते. चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही डिव्हीआर, एकमेकांना फोन करण्यासाठी वापरलेले सिमकार्ड नष्ट करून त्यांनी पुरावे देखील मिटवले. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून सध्या वेशातील पोलीस कमलेशच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्यानंतर त्याने चोरीचे सोने दुकानात विकायला आणण्यास सुरवात केली. मात्र 'कानुन के लंबे हाथ' अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचलेच.

टॅग्स :पोलिसअटकमुंबई