दोन तासांतच फेरीवाल्यांनी मांडले पुन्हा बस्तान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 01:44 AM2018-08-11T01:44:48+5:302018-08-11T01:45:00+5:30
वरळीतील जी.एम. भोसले मार्गावर असणाऱ्या बाळकृष्ण गावडे व्यापारी मंडईला पडलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा सुटण्याऐवजी अजून घट्ट बसत चालला आहे.
- अजय परचुरे
मुंबई : वरळीतील जी.एम. भोसले मार्गावर असणाऱ्या बाळकृष्ण गावडे व्यापारी मंडईला पडलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा सुटण्याऐवजी अजून घट्ट बसत चालला आहे. येथे अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या जी-साऊथ वॉर्ड विभागाच्या अधिकाºयांनी कारवाईही केली. मात्र, मंडईसमोरच्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवता हटवता पालिकेने अधिकृतपणे गाळा चालवणाºया दुकानदारांवरही कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेच्या या अजब न्यायामुळे सध्या गावडे मंडईतील व्यापारीही संभ्रमात पडले आहेत. दुसरीकडे कारवाई झाल्यानंतर फक्त २ तासांतच अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान पुन्हा बसवल्याने ही पालिकेची कारवाई होती की नाटक, याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
वरळी नाक्याला लागून असलेल्या या मंडई परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्यामुळे येथून चालताना नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही मंडईपासून १५० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. मात्र, या सर्व आदेशांना झुगारून हे फेरीवाले मंडईच्या दारातच आपले दुकान थाटून बसले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने लुटुपुटुच्या कारवाईचे नाटक केले. ज्यामध्ये काही अनधिकृत फेरीवाल्यांचे सामान तर जप्त करण्यात आलेच; पण मंडईत अधिकृतपणे आपला व्यवसाय करणाºया व्यापाºयांच्या दुकानांवरही या अधिकाºयांनी आपला मोर्चा वळवला. पालिकेच्या या अजब कारवाईने त्या व्यापाºयांना धक्काच बसला.
कारवाई केल्यानंतर पालिकेचे अधिकारी निघून गेले आणि २ तासांतच अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले. त्यामुळे ही कारवाई म्हणजे केवळ दिखावा आहे. पालिका जाणूनबुजून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी या अनधिकृत फेरीवाल्यांना मंडईसमोरून हटवत नसल्याची टीका गावडे व्यापारी मंडईतील व्यापारी किशोर गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
>...यामागे साटेलोटे?
पालिकेला या व्यापाºयांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. २०१५ पासून सतत या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेच्या जी-साउथ वॉर्ड विभाग कार्यालयात येथील व्यापाºयांनी खेटे घातले आहेत; परंतु तात्पुरती कारवाई करण्यापलीकडे पालिकेने काहीही केलेले नाही. पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांविरोधात कारवाई का करत नाही? पालिकेचे आणि फेरीवाल्यांचे काही साटेलोटे आहे का, असा सवाल गावडे मंडईतील व्यापाºयांनी उपस्थित केला आहे.
>पालिकेतर्फे विकसित झालेली पहिली मंडई
बाळकृष्ण गावडे व्यापारी मंडई ही पालिकेतर्फे पुनर्विकास झालेली (मार्च २०१५) पहिली मंडई आहे. २२ हजार स्क्वेअर फूट परिसरात असलेल्या या मंडईत एकूण १३० व्यापारी गाळे आहेत. मात्र, मंडई पुनर्विकसित होताच फेरीवाल्यांनी मंडईभोवतालच्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. सध्या येथे इतके फेरीवाले वाढलेत की, प्रवेशद्वारावरून आत येताना ग्राहकांना अडसर निर्माण होत आहे. गावडे मंडईतील अधिकृत गाळे असणाºया व्यापाºयांचे यामुळे अतोनात नुकसान होत आहे.
>अधिकृत गाळेधारकांचे होतेय नुकसान
पाणीबिल, वीजबिल, महापालिकेचे टॅक्स, तसेच मंडईत कामाला असणाºया नोकरांचे पगार हा इतका खर्च असताना फेरीवाल्यांमुळे या व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
फेरीवाल्यांनी वाट अडवून ठेवल्याने गिºहाईक मंडईमध्ये येण्यास पाठ फिरवितात. तसेच मंडईला लागून असलेल्या फूटपाथवरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने, दुचाकी, चारचाकी या भागात उभी करण्यासाठीही जागा नाही. मंडईतील दुकानांत बाहेरील माल भरण्यासाठी रात्रीशिवाय पर्याय नसतो. अर्ध्या रस्त्यापर्यंत या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वरळी नाका परिसरात वाहतूककोंडीचे चित्रही आता नित्यनेमाचे झाले आहे.
>सहायक आयुक्त नॉट रिचेबल : दरम्यान, याबाबत जी साउथ वॉर्डचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.