दोन तास आरटीओ ठप्प
By Admin | Published: March 27, 2015 12:46 AM2015-03-27T00:46:34+5:302015-03-27T00:46:34+5:30
अंधेरी आरटीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लायसन्स देण्यास विलंब केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते.
मुंबई : अंधेरी आरटीओ कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लायसन्स देण्यास विलंब केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले होते. मात्र यामध्ये निलंबित कर्मचाऱ्यांची बाजू लक्षात न घेताच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेकडून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. दोन तास केलेल्या या आंदोलनामुळे आरटीओतील कामकाज मात्र ठप्पच झाले आणि त्याचा फटका कामानिमित्त येणाऱ्यांना बसला.
आॅगस्ट २0१४ मध्ये डॉ. खोसला यांनी अंधेरी आरटीओत लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज सादर केला होता आणि हे लायसन्स देण्याच्या कार्यवाहीस बराच विलंब लागला. त्याचप्रमाणे दलालांनीही काम पूर्ण करण्यासाठी २,७00 रुपये मागितले. याविरोधात परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी अंधेरी आरटीओतील संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर २५ मार्च रोजी निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत मोटार वाहन विभाग संघटनेकडून करण्यात आले. तसेच या कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडू देण्यात आली नसून निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईतील तीनही आरटीओत लेखणी बंद आंदोलन केले.
या आंदोलनाचा फटका मात्र आरटीओत लायसन्स आणि अन्य कामानिमित्ताने सकाळी दहा वाजता आलेल्यांना दोन तास ताटकळ राहावे लागले. लर्निंग आणि पक्के लायसन्स चाचणी, लायसन्सचे नूतनीकरण, कर आणि अन्य कामे यामुळे चांगलीच रखडली. संघटनेच्या प्रतिनिधींनी परिवहन आयुक्त झगडे यांची भेट घेतल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळताच आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)
च्दोन तासांचे हे आंदोलन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी आपल्या जागेवर उपलब्धच होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम आरटीओ कार्यालयाच्या दिवसभराच्या कामावर झाल्याचे पाहावयास मिळत होते.
च्सकाळी दहा वाजता आलेल्यांना दोन तास ताटकळ राहावे लागले. लर्निंग आणि पक्के लायसन्स चाचणी, लायसन्सचे नूतनीकरण, कर आणि अन्य कामे यामुळे चांगलीच रखडली.