Join us

पनवेलमध्ये जमिनीच्या वादातून दोन घरांवर हल्ला

By admin | Published: March 16, 2015 10:48 PM

तालुक्यातील नेवाळी गावामध्ये रविवारी रात्री एका पंधरा ते वीस जणांच्या जमावाने दोन घरांवर दगड, विटांनी हल्ला करून त्या घराचे नुकसान केले.

पनवेल : तालुक्यातील नेवाळी गावामध्ये रविवारी रात्री एका पंधरा ते वीस जणांच्या जमावाने दोन घरांवर दगड, विटांनी हल्ला करून त्या घराचे नुकसान केले. या प्रकरणी तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांना खांदा वसाहत येथील अष्टविनायक रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर याच जमावाने दोन मोटारसायकलींचेही नुकसान केल्याचे समजते. फिर्यादी मोतीराम काथारा यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा हल्ला केबल लाइन टाकण्यावरून, त्याचप्रमाणे गावाच्या जमिनीच्या वादातून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जमिनीचा निकाल एका बाजूने लागल्याने त्यांनी दिलेल्या हल्लेखोरांच्या नावावरून त्यांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.नेवाळी गावात राहणारे मोतीराम काथारा (३८) हे रविवारी सायंकाळी घरात टीव्ही पाहत असताना अचानकपणे त्यांच्या घराच्या काचा फुटल्याचा आवाज येवू लागला. त्यामुळे ते सहकुटुंब बिल्डिंगच्या टेरेसवर गेले. त्यावेळी पंधरा ते वीस जण दगड, विटा घेवून त्यांच्या इमारतीच्या दिशेने त्या फेकून काचा फोडत होते. अशाच प्रकारे त्या जमावाने त्यांचा भाऊ चंद्रकांत काथारा यांच्या घराच्याही काचा फोडल्या, तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलींचेही नुकसान केले. यावेळी या जमावाने श्रीपाद काथारा, संजय गुंजळे व सागर खरात यांनाही जबरी मारहाण करण्यात आली व शिवीगाळ करून निघून गेले. हा वाद जमिनीच्या निकालावरून झाल्याचे प्रथमदर्शनी समजते.या हल्ल्यात जखमी झालेल्यांना खांदा वसाहत येथील अष्टविनायक रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे व याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. (वार्ताहर)