दोन दिवसात दोनशे कावळे, कबूतर मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:11+5:302021-01-14T04:07:11+5:30
मुंबई - बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल्यानंतर पालिका आपत्कालिन विभागाकडे तक्रारी वाढू लागल्या आहेत. ...
मुंबई - बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल्यानंतर पालिका आपत्कालिन विभागाकडे तक्रारी वाढू लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसात सुमारे दोनशे कावळे आणि कबूतर मृत झाल्याच्या तक्रारी आपत्कालिन कक्षाकडे आल्या आहेत.
रस्त्यावर कोणताही पक्षी मरून पडला असल्यास त्याला हात न लावता १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानंतर मंगळवार सकाळपासून कुलाबा, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, दादर, प्रभादेवी, वडाळा, माटुंगा, सायन, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरातून तक्रारी आल्या.
त्यानुसार सुमारे दोनशे कावळे आणि कबूतर मृत आढळून आल्याच्या तक्रारी हेल्पलाईनवर आल्या आहेत. पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि राज्य पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.