भविष्यातील सोशल डिस्टंसिंगसाठी हफिझ काँन्ट्रॅक्टर यांची भूमिका
मुंबई - एका वशिष्ठ मर्यादेपेक्षा जास्त उंचीच्या इमारती उभारण्यास सध्या परवानगी मिळत नाही. त्यामुळे विशेषतः मुंबईतला झोपडपट्ट्यांचा विकास खुंटला आहे. कोरोनाच्या संकटानंतर सोशल डिस्टंसिंगचे महत्व अधोरेखित झाले असून झोपडपट्टीमुक्त शहरांसाठी दोनशे – दोनशे मजल्यांपर्यंतच्या इमारतींना परवानगी द्यायला हवी. सरकार आणि सनदी अधिका-यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेत प्रचलित कायद्यांमध्ये बदल करावे असे मत सुप्रसिद्ध आर्किटेक्ट हफीझ काँन्ट्रॅक्टर यांनी व्यक्त केले आहे.
जगभरातील काँर्पोरेट आणि स्टार्टअप व्यावसायिकांना एकत्र आणणा-या काँर्पगिनी या कंपनीने मंगळवारी आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. याच कंपनीच्या सोमवारी झालेल्या एका सेमिनारमध्ये प्रख्यात उद्योजक मुंबईतील झोपडपट्टी आणि त्यांच्या पुनर्विकासाच्या धोरणांवर टीका केली होती. त्या झोपड्यांच्या पुनर्विकास सुकर करण्याचा पर्याय मंगळवारी काँन्ट्रँक्टर यांनी सुचविला.
कोरोनाच्या संकटनंतर प्रत्येकाचे राहणीमान बदलणार आहे. त्यासाठी शहरांची सध्याची वीण आपल्याला बदलावी लागेल. मोकळ्या जागांना अधिकाधिक महत्व प्राप्त होणार आहे. परंतु, जमीन मर्यादीतच आहे. आपण त्याची निर्मितीही करू शकत नाही किंवा त्यात वाढही करू शकत नाही. त्यामुळे कमी जागेवर जास्त लोकांच्या वास्तव्याची सोय करणे क्रमप्राप्त ठरेल. त्यासाठी मुंबई सारख्या शहरांमध्ये सिंगापुर आणि अन्य शहरांच्या धर्तीवर अधिकाधिक मजल्यांच्या गगनचुंबी इमारती उभारण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी असे मत त्यांनी मांडले. नवनव्या तंत्रज्ञनाच्या सहाय्याने ते शक्य आहे. मात्र, आर्किटेक्ट म्हणून आम्ही कोणतेही नियोजन केले तरी सरकारी परवानगीशिवाय ते साध्य होणारे नाही. त्यामुळे त्या आघाड्यांवर हा विचार रुजायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.
------------------------------------
जास्तीत जास्त काम घरी बसूनच व्हावे
घर ही एकमेव सुरक्षित जागा आहे आणि यापुढील कामाचे स्वरूप डिजीटल असेल हे कोरोनाने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारती उभारताना त्या डिजीटल असतील याची काळजी घ्यावी लागेल. कामासाठी कार्यालयात कमीत कमी वेळा यावे लागले तर शहरांमधील कोंडी निश्चितच कमी होईल. तशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी असे मत प्रख्यात आर्किटेक्ट रझा काबुल यांनी व्यक्त केले.