मुंबई : भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात रिक्षात बसलेले दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह परिचारीकेचा समावेश आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कारचालक अनिकेत भामरेला (२८) नवघर पोलिसांनी अटक केली आहे. मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीमध्ये अरुंधती शिंदे आणि अविनाश बांदोडेकर राहण्यास आहेत. शिंदे या नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत, तर बांदोडेकर अग्निशमन दलात काम करतात. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. दोघेही कामावर जाण्यासाठी निघाले होते. अशात कॅम्पस हॉटेलजवळ भरधाव वेगाने आलेल्या भामरेच्या कारने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी झाली.स्थानिकांच्या मदतीने रिक्षाचालकासह तिघांनाही तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यामध्ये शिंदे यांना जबर मार बसला आहे. घटनेची माहिती मिळताच, नवघर पोलीस तेथे दाखल झाले. अपघातप्रकरणी भामरेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
मुलुंडमध्ये कारच्या धडकेत दोघे जखमी
By admin | Published: January 29, 2017 1:41 AM