ठाण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारदासह दोघांची चौकशी
By admin | Published: December 14, 2015 02:22 AM2015-12-14T02:22:47+5:302015-12-14T02:22:47+5:30
बिल्डर सूरज परमार आणि नगरसेवक यांच्यात आर्थिक व्यवहारांसंबंधी सेटलमेंट करणाऱ्या ठाण्यातील एका वास्तुविशारदासह दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : बिल्डर सूरज परमार आणि नगरसेवक यांच्यात आर्थिक व्यवहारांसंबंधी सेटलमेंट करणाऱ्या ठाण्यातील एका वास्तुविशारदासह दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चौघाही नगरसेवकांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपास पथकाकडून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी केली जाणार आहे.
एका वास्तुविशारदासह पालिकेच्या बड्या अधिकाऱ्यानेही या प्रकरणात सेटलमेंट’साठी सूरज परमार यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे ठाणे महापालिकेत शहर विकास विभागात दबदबा असलेल्या एका वास्तुविशारदास पोलिसांनी गेली चार दिवस चौकशीकरिता बोलावले होते. ‘सेटलमेंट’ करणारा पालिकेतील एक बडा अधिकारी कोण? याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांची १४ डिसेंबर रोजी कोठडीची मुदत संपणार आहे. गेल्या नऊ दिवसांच्या कोठडीतील कालावधीत या चौघांकडून कोणती माहिती मिळाली किंवा त्यांचे आणि परमार यांचे नेमके काय आर्थिक संबंध आले? तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा संबंध आहे का? याबाबतची माहिती सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांच्या पथकाकडून सोमवारी न्यायालयात सादर केली जाणार आहे. काही साक्षीदार या दिग्गज नेत्यांसमोर येऊन काही माहिती देण्यास धजावत नसल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने चौघांच्याही पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.