आरवली : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर आज, बुधवारी सकाळी स्वीफ्ट कार आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार, तर गंभीर जखमी झालेल्या राज सुभाष रसाळ याला अधिक उपचारासाठी नेताना वाटेतच त्याचे निधन झाले. अपघातात अन्य सातजण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ६.३०च्या सुमारास दाट धुके पडले असताना रत्नागिरीहून श्रीवर्धनला जाणारी स्वीफ्ट कार आणि मुंबईहून साखरप्याकडे जाणारी खासगी बस यांच्यात तुरळ-डिकेवाडी स्टॉपनजीक अपघात झाला. महामार्गावर दाट धुके असल्याने समोरचे वाहन दिसत नव्हते. त्यातून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. साईकृपा ट्रॅव्हल्सची बस (एमएच ०४ एफके ३७९) नरेश लालजी वाणी (२७, दहिसर) हा चालवत होता. तुरळ येथे स्वीफ्ट कारवर जोराने आदळल्याने ट्रॅव्हल्स बसही रस्त्याच्या बाजूला कलंडली. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातात किशोर शंकर गांधी (३२, रत्नागिरी) हा जागीच ठार झाला.अपघाताची खबर मिळताच तुरळ येथील रिक्षाचालक मिलिंद चव्हाण, सचिन सुर्वे, विठोबा गोमाणे, राजू रेडीज, नीतेश धामनाक हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या राज सुभाष रसाळ (१०, रत्नागिरी) याला उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. इतर जखमींना रत्नागिरी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये अनिता अनंत केतकर (वय ५९, श्रीवर्धन), अरुण धनू पापडे (३६, मुंबई), जान्हवी अरुण गंगावणे (८, दापोली), गीता सुरेश पापडे (५०, मुंबई), अक्षता अरुण गंगावणे (१२, दापोली), विशाल शंकर चव्हाण (३२, दहिसर) यांचा समावेश आहे. अपघाताचा तपास माखजन पोलीस ठाण्याचे अंमलदार डी. एस. पवार करीत आहेत. (वार्ताहर)
तुरळ येथे अपघातात दोन ठार; सात जखमी
By admin | Published: November 05, 2014 11:02 PM