लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भरधाव वेगाने निघालेल्या दुचाकीचा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बसला धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना माहीममध्ये घडली. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.
अंधेरीतील सहारगावमध्ये कुटुंबासोबत राहणारा नीलेश पाटील (२४) हा रविवारी रात्री ११च्या सुमारास त्याचे मित्र भावेश धोरणे (२८) आणि विकास सोनवणे (२३) यांच्यासोबत दुचाकीने माहीम येथून दादरच्या दिशेने जात होता. सेनापती बापट मार्गावरून भरधाव वेगाने जात असताना पाटील याचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक होऊन अपघात झाला.
- घटनेची वर्दी मिळताच, पोलिसांना घटनास्थळी धाव घेत तिन्ही जखमींना उपचारांसाठी केईएम रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी चालक पाटील आणि मागे बसलेल्या धोरणे यांना दाखल करण्यापूर्वीच मृतघोषित केले, तर सोनवणेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. - पोलिसांनी अपघाती घटनेची नोंद करत दुचाकीचालक पाटील विरोधात हयगयीने, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून स्वतःच्या धोरणे याच्या मृत्यूस आणि सोनवणे याला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.