दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:30 AM2020-04-29T01:30:12+5:302020-04-29T06:41:53+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता गोवंडी बैगनवाडी येथे ही घटना घडली.
मुंबई : शिवाजीनगर पोलिसांवर दगडफेक करत एका पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत सोमवारी पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तर एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. यात बाबू इमाम हुसेन शेख ऊर्फ बाबू टोपी (४५) आणि अमन ऊर्फ रज्जाक रमजान शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे असून, अन्य चौकडीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता गोवंडी बैगनवाडी येथे ही घटना घडली.
यात, २०१९पासून सुरू असलेल्या पूर्ववैमनस्यातून दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी जवळील कुºहाड, तलवारीने हल्ला चढविला. यात, रज्जाब समशेरअली खान (२३), प्रेमसिंंग वीरेंद्र सिंंग (२५) आणि मोहम्मदअली समशेरअली खान (२०) गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे रज्जाब आणि प्रेमसिंंगला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर मोहम्मदअलीचा जबाब नोंदवून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे़
>लॉकडाउनच्या काळात हल्ले... आणि हत्यासत्र
>२६ एप्रिल
पोलिसांवर दगडफेक
गोवंडीतील शिवाजीनगर झोपडपट्टीत फळे, भाजी आणि अन्य वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांभोवती जमलेली गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत असताना चिडलेल्या रहिवाशांनी चिथावणीखोर घोषणाबाजीसह पोलिसांवर दगडफेक करत एका पोलिसावर जीवघेणा हल्ला चढविला होता. यापुर्वी ३ एप्रिल रोजीदेखील शिवाजीनगरमध्ये गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबूने मारहाण करण्यात आली. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे येथील परिस्थितीवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक होताना दिसते़
>२५ एप्रिल
वडिलांची हत्या
घरगुती वादातून भांडुपमध्ये मुलानेच वृद्ध वडिलांची हत्या केली. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात मुलगा सचिन गोरिवले (३४) विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
२० एप्रिल
शिवडीत भावांची हत्या
पार्किंगच्या वादातून शिवड़ीत दोन भावांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी दोन महिलांसह चौघांना अटक केली आहे.