मुंबई : दादर आणि गोरेगाव येथे दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा बळी गेला. दादरमध्ये ट्रकखाली चिरडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न झाल्याने त्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी दादर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाला अटक केली तर गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात एक जण ठार आणि एक जखमी झाला.दादर येथील सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजारासमोर हा अपघात घडला. येथे आरोपी ट्रकचालकाने शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ट्रक उभा केला होता. या ट्रकखालीच हा तरुण झोपला होता. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चालकाने ट्रक तेथून काढल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला अटक केली. तरुणाचा मृतदेह केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ओळख पटेल असे कोणतेही साहित्य त्याकडे सापडलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. गोरेगावात दुचाकी अपघातात एक तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.
ट्रक आणि दुचाकीच्या अपघातांत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2016 3:27 AM