Join us  

संगमेश्वरजवळ दुचाकी-आरामबस अपघातात दोन ठार

By admin | Published: October 24, 2015 10:27 PM

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर रेल्वे स्थानक अपघात

संगमेश्वरजवळ दुचाकी-आरामबस अपघातात दोन ठार देवरुख : दुचाकी आणि आरामबसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर रेल्वे स्थानकानजीक घडला. मसूद काझी (वय १८) आणि अरसलान नायकोडी (१७, दोघेही रा. कसबा मोहल्ला) अशी मृत तरुणांची नावे आहेत. कसबा मोहल्ला येथे राहणारे मसूद काझी आणि अरसलान नायकोडी हे दोघे दुचाकीवरून (एमएच-०३ एजे-०४९८) रात्री दहाच्या सुमारास धामणी गोळवली येथे गेले होते. १०.४५ च्या सुमारास ते धामणी येथून पुन्हा कसबा येथे जाण्यास निघाले. भरधाव वेगात असलेली ही दुचाकी संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकाच्या समोर आली असता गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लंबोदर ट्रॅव्हल्सच्या आराम बस (एमएच-०८ ई-९७७१) वर आदळली. ही धडक एवढी जोरात होती की, दोघांच्याही मेंदूंचा चेंदामेंदा झालाच शिवाय आरामबसचा बंपर तुटून खाली पडला. अपघाताचा आवाज ऐकून शेजारीच असणाऱ्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरचे दृश्य भीषण होते. तातडीने याची खबर संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली. वाहतूक पोलीस आणि संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका घेऊन चालक प्रसाद सप्रे, बाळू रहाटे, मंंगेश राऊत यांनी दोघांचेही शव संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे विच्छेदन करून रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. कसब्यातील नायकोडी आणि काझी कुटुंबीयांवर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी या तरुणांचा दफनविधी करण्यात आला. (प्रतिनिधी)