Join us

Coronavirus: कोरोनाच्या निदानासाठी मुंबई, नागपुरात दोन प्रयोगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 7:33 PM

21 जणांना घरी सोडले; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती   

मुंबई: कोरोना व्हायरसचे निदान करण्याकरीता राज्यात मुंबई आणि नागपूर येथे विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला भारतीय आर्युविज्ञान व संशोधन परिषदेने त्याला मान्यता दिली आहे. दरम्यान राज्यात नव्याने चार जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 21 जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.         

कोरोनाचे निदान करण्याकरीता सध्या राज्यात पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे रुग्णालयात दाखल झालेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. आता या सुविधेचा विस्तार करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे या प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रुग्णालयात दाखल झालेल्यांचे प्राथमिक स्तरावरील चाचणी तेथेच होऊ शकते.ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले सर्व 21 प्रवाशांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे एन.आय.व्ही. यांनी सांगितल्यानंतर निरिक्षणाखाली असलेल्या सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज राज्यात 4 नवीन प्रवाशांना भरती करण्यात आले आहे. या पैकी 3 जण नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक जण मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती झाला आहे. आज त्यांचे नमुने प्रयोगशाळांना पाठविण्यात आले आहेत.             

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 12 हजार 99 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 199 प्रवासी आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 119 प्रवाशांपैकी 40 जणांचा 14 दिवसांचा आरोग्य विषयक विचारपूस करणारा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. अन्य प्रवाशांचा पाठपुरावा सुरु आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना