मुंबई : दारूच्या नशेत लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना स्टंटबाजी चांगलीच महागात पडली. स्टंटबाजी करताना दोघेही लोकलमधून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपर स्टेशनजवळ घडली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने, त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू खान (२५), अमित सिद्धू (२५), लुकमान सिंगुरखान (२0) हे तीन मित्र कांजूरमार्ग येथे राहतात. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास डाउनला जाणारी कर्जत धिमी लोकल त्यांनी घाटकोपर स्थानकातून पकडली. ही लोकल पकडताच, या तिन्ही मित्रांनी दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र, दारूच्या नशेत असलेले हे तिघेही प्रवास करताना खांबाला हात लावण्याची स्टंटबाजी करू लागले. यातील राजू खान हा एका खांबाला जोरदार धडकला आणि लोकलमधून पडला. मात्र, पडतानाच राजूचा धक्का हा अमितलाही लागला आणि त्यामुळे अमितही लोकलमधून पडला. घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ही घटना घडताना, दोघेही जबर जखमी झाले. याची माहिती त्यांचा तिसरा मित्र लुकमान याने तत्काळ पोलिसांना दिली. या घटनेत राजू आणि अमित हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
दोन दारुड्यांना स्टंटबाजी पडली महागात; लोकलमधून पडून गंभीर जखमी
By admin | Published: December 17, 2015 2:36 AM