मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळाला असून, अखेरपर्यंत १ लाख ४५ हजार ८४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करत सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून, सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका तसेच ॲन्टॉप हिल व विक्रोळीच्या कन्नमवारनगरमधील सदनिकांचा समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटाकरिता पहाडी गोरेगाव, लोकमान्यनगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर - गोरेगाव पश्चिम, डीएननगर - अंधेरी, पंतनगर - घाटकोपर, कन्नमवारनगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीरनगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणी सदनिका उपलब्ध आहेत.
उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीरनगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकारनगर चेंबूर, लोकमान्यनगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, गायकवाडनगर मालाड, प्रतीक्षानगर सायन, चारकोप कांदिवली येथील गृहप्रकल्पांतर्गत मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांचा समावेश आहे.
उच्च उत्पन्नमध्ये जुहू - अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथील सदनिकांचा समावेश आहे.
आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा १२ जुलैला संबंधित बँकेत करता येईल. १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजताअर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर. प्रारूप यादीपासून १९ जुलैला दुपारी ३ पर्यंत ऑनलाइन दावे-हरकती दाखल करता येतील. २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.