नीलेश पेडणेकर कुटुंबीयांना दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:04 AM2019-07-29T03:04:40+5:302019-07-29T03:05:24+5:30
कारवार कुर्मगड बोट अपघात : कारवार भंडारी मित्रमंडळाचा पुढाकार
मुंबई : कर्नाटकच्या कारवारमध्ये कुर्मगड जत्रेदरम्यान घडलेल्या बोट दुर्घटनेत गोरेगावमध्ये राहणाऱ्या नीलेश पेडणेकर (३९) यांचा मृत्यू झाला होता. घरातला कमवता माणूस असा अचानक निघून गेल्याने दोन चिमुरड्यांचा समावेश असलेले त्यांचे कुटुंब पार कोलमडून पडले होते. तेव्हा या निराधारांना मदत करण्यासाठी कारवार भंडारी मित्रमंडळाने पुढाकार घेतला. त्यानुसार, २ लाख रुपयांचा धनादेश आर्थिक मदतीच्या स्वरूपात गुरुवारी पेडणेकर कुटुंबाला देण्यात आले.
गोरेगाव पूर्वच्या नागरी निवारा वसाहतीत मयत पेडणेकर यांची पत्नी नेहा (३६), मुलगी इशिता (७), नैतिक (५) तसेच त्यांचे वृद्ध आईवडील राहतात. कॅटरिंगचा व्यवसाय करत उदरनिर्वाह चालविणाºया पेडणेकर यांच्यावर काळाने अशी अचानक झडप घातल्याने हे कुटुंब वाºयावर पडले. याबाबतचे वृत्त २३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने ‘कारवार बोट दुर्घटना : खरे नाही वाटत, माझा पूत मला सोडून गेला!’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, कारवार जिल्हा भंडारी संघाचे मुंबई अध्यक्ष नागेश रायकर यांनी संघातील सदस्यांना अधिकाधिक मदत पेडणेकर कुटुंबीयांना करण्याचे आवाहन केले होते. संघाचे सचिव शरद पेडणेकर, सल्लागार गोवर्धन पेडणेकर, गटप्रमुख अजित पत्रेकर यांनी सात महिने सतत पाठपुरावा करत, कारवार भंडारी मित्रमंडळाच्या सहकार्याने २ लाख रुपये पेडणेकर कुटुंबासाठी मदतीच्या स्वरूपात गोळा केले. हा धनादेश २५ जुलै रोजी पेडणेकर यांच्या कुटुंबाला रायकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी रायकर यांच्यासह संघाचे वरिष्ठ मार्गदर्शक रत्नाकर म्हाडोळकर, अनिल कलगुटकर, गोवर्धन पेडणेकर, शरद पेडणेकर, अजित पत्रेकर आणि माधव तामसे हे पदाधिकारी उपस्थित होते. कारवारमध्ये २१ जानेवारीला कुर्मगड जत्रेत समुद्रात बोट उलटून पेडणेकर यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून अद्याप त्यांचे कुटुंब सावरलेले नाही.
समाज बांधवांचे आभार
नियतीने घाला घातलेल्या नीलेश पेडणेकर यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी खारीचा वाटा आम्ही उचलू शकलो, यासाठी कारवार भंडारी मित्रमंडळासह सर्व समाज बंधवांचा मी आभारी आहे. यामुळे आम्हास मानसिक समाधान मिळाले आहे, असे रायकर यांनी सांगितले.