रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली उकळले दोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:13+5:302021-06-17T04:06:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घाटकोपरमधील तरुणाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठगाने दोन लाख रुपये उकळल्याची घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपरमधील तरुणाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठगाने दोन लाख रुपये उकळल्याची घटना मंगळवारी समोर आली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने घाटकोपर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
घाटकोपर परिसरात २० वर्षीय तक्रारदार तरुण राहताे. तो एका मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर आहे. त्याचा रूम पार्टनर मेहंद्रन सदाशिवम मुदलीयार (४२) याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. नोकरीसाठी आधी दोन लाख आणि नोकरी लागल्यानंतर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार तरुणाने त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे दिले. जानेवारीत मुलाखत असल्याचे सांगितल्याने तरुणाचा विश्वास आणखी वाढला.
मात्र, त्यानंतर १८ जानेवारीपासून मुदलीयार घरातील सामान घेऊन नॉट रिचेबल झाला. त्याच्या आधार कार्डवरील पत्ताही बोगस असल्याचे समाेर आले. तरुणाने काही दिवस त्याची वाट बघितली. त्यानंतर रेल्वेत चौकशी केली. त्या वेळी मुदलीयारने फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आले. अखेर त्याने या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
....................................