कृषी योजनांसाठी ऑनलाइन सोडतीत दोन लाख शेतकऱ्यांची निवड - दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:06 AM2021-02-15T04:06:57+5:302021-02-15T04:06:57+5:30
मुंबई : शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलवरील ऑनलाइन सोडतीत दोन लाख शेतकऱ्यांची ...
मुंबई : शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलवरील ऑनलाइन सोडतीत दोन लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नवीन विहिरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. ज्यांची निवड झाली आहे, त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज करावे लागत होते. तसेच अर्ज केलेल्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ मिळाला नाही, तर पुढील आर्थिक वर्षात नव्याने अर्ज करावा लागायचा. प्रत्येक अर्जासोबत कागदपत्रेही स्वतंत्रपणे जोडावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातूनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली तसेच आवश्यक कागदपत्रे एकदाच जोडण्याची सोय झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करण्याची गरज राहिली नाही. शिवाय, लाभ न मिळाल्यास पुढील वर्षी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
या ऑनलाइन प्रणालीस राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करून विविध योजनांतर्गत मागणी नोंदवली. प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांची ऑनलाइन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहिरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करून त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतील. जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची निवड रद्द करून संगणकीय प्रणालीद्वारे प्रतीक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.