हज यात्रा : दोन लाख मुस्लीम भाविक यंदा हज यात्रा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 07:20 AM2019-06-10T07:20:40+5:302019-06-10T07:20:55+5:30

मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती : ९६ हजार महिलांंचा समावेश

Two lakh Muslim devotees are going to visit Hajj this year | हज यात्रा : दोन लाख मुस्लीम भाविक यंदा हज यात्रा करणार

हज यात्रा : दोन लाख मुस्लीम भाविक यंदा हज यात्रा करणार

Next

मुंबई : मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेला देशातून यंदा २ लाख भाविक जाणार असून, त्यामध्ये ९६ हजार महिलांचा समावेश आहे. देशातील २१ शहरांमधून ५०० विमानांद्वारे हे यात्रेकरू हजला जातील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुंबईत दिली. हज यात्रेकरूंना देण्यात येणारे सरकारी अनुदान बंद केल्यानंतर या यात्रेच्या दरात वाढ झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्रीय हज समितीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नक्वी बोलत होते. या वेळी हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.ए. खान व हज समितीचे सदस्य उपस्थित होते. २ लाख यात्रेकरूंपैकी १ लाख ४० हजार यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून हजला जाणार आहेत. तर उर्वरित ६० हजार यात्रेकरू खासगी टुर आॅपरेटरच्या माध्यमातून जातील. या ६० हजारपैकी १० हजार यात्रेकरूंना हज समितीने ठरवलेल्या दरामध्ये हजला नेण्याचे बंधन खासगी टुर आॅपरेटरवर असल्याची माहिती नक्वी यांनी दिली.
देशभरातील ७२५ खासगी टुर आॅपरेटर यंदा भाविकांना हजला पाठवणार आहेत. त्यांच्या माध्यमातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या माहितीसाठी विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले असून त्यामध्ये यासाठी लागणारा खर्च व इतर अनुषंगिक माहिती पुरवण्यात आलेली आहे. यात्रेकरूंना सुरक्षित व चांगल्या सुविधा पुरवण्याचे सरकारचे ध्येय असून त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा चालवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. बहुसंख्य आॅपरेटर चांगले काम करत आहेत. तीन आॅपरेटरविषयी तक्रार आल्यानंतर त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

४ जुलैला पहिल्या विमानाचे उड्डाण होणार
पहिल्या टप्प्यातील पहिल्या विमानाचे ४ जुलैला उड्डाण होईल. दिल्ली, गया, गुवाहाटी व श्रीनगर या शहरांतून ४ जुलैला विमान सुटेल व त्यानंतर २१ जुलैपर्यंत बंगळुरू, कालिकत, कोचिन, गोवा, मंगळुरू, श्रीनगर येथून विमानाचे उड्डाण होईल. मुंबईतून १४ व २१ जुलैला विमान सुटेल. दुसºया टप्प्यात अहमदाबाद, औरंगाबाद, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, जयपूर, लखनऊ, नागपूर, रांची व वाराणसी येथून २९ जुलैपर्यंत विमानांची उड्डाणे होतील.

Web Title: Two lakh Muslim devotees are going to visit Hajj this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.