Join us

बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात महाराष्ट्रात दोन लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 1:48 AM

ड्रोन ठेवणार लक्ष

मुंबई : बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यातील अकरा कोटींहून अधिक जनता सज्ज झाली असताना यात कसलेही विघ्न येऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दल सज्ज झाले आहे. बाप्पाचे विर्सजन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी राज्यभरात दोन लाखांहून अधिक तर राज्याची राजधानी मुंबईत ५० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपासून मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी ते तैनात राहतील. मुंबईतील चौपाट्या, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल.

पोलिसांच्या मदतीला अन्य सुरक्षा यंत्रणा व होमगार्डही नेमण्यात आले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, संशयास्पद व्यक्ती व वस्तूबाबत तत्काळ पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी केले आहे.काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर त्याला अतिरेकी संघटनांनी विरोध केला आहे, त्यांच्याकडून गर्दीच्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने खबरदारी घेण्यात आली आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवर विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाच्या जल्लोषात मग्न असलेले नागरिक आता त्याला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी योग्य त्या सर्व दक्षता घेण्याचे आदेश सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना महासंचालक जायस्वाल यांनी दिल्या आहेत.

मुंबईतील महत्त्वाची, गर्दीची ठिकाणे तसेच मिरवणूक मार्ग व चौपाटीच्या ठिकाणी पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महिला व लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने विशेष पथके बनविण्यात आली आहेत. साध्या वेशातही पोलीस पाळत ठेवणार आहेत. हरविलेल्या मुलांसाठी, व्यक्तीसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र आहेत. या संदर्भात मेगाफोनद्वारे सातत्याने उद्घोषण केली जाणार आहे, तसेच विविध चौपाटी व महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रथमोपचार व नागरी सुविधा केंद्र आणि वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.वाहतूक मार्गात बदलमहानगरातील विसर्जन मिरवणुकीमुळे शहर व उपनगरातील वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. ५६ ठिकाणे वाहनांसाठी बंद असतील, तसेच ५३ जागी दुहेरी मार्ग बंद करून एकेरी बनविण्यात आले आहेत. याशिवाय १८ ठिकाणी अवजड वाहनांना बंदी आणि ९९ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे.जलतरणपटू, तटरक्षकही बोटीसह तयारश्रींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी महानगरातील सर्व चौपाट्यांवर भाविक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली, वस्तूवर नजर ठेवली जाईल, तसेच विसर्जनाच्या ठिकाणी जलतरणपटू, तटरक्षकासह बोटी व लाँचेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.

भाविकांसाठी हेल्पलाइनविर्सजन मिरवणुकीत कोणतीही अत्यावश्यकसेवा किंवा मदत हवी असल्यास, भाविकांनी पोलीस नियंत्रण कक्षाबरोबरच टिष्ट्वटर, एसएमएसद्वारे ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :पोलिस