मुंबई : लॉकडाउनमुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी १ जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून तिकीट आरक्षित करण्यात सुरुवात केली. तीन तासांत २०० रेल्वेची १ लाख ८० हजार तिकिटे आरक्षित झाले. तर, १ जूनच्या २०० पैकी ७६ ट्रेन फुल्ल झाल्या. बिहार, उत्तरप्रदेश या राज्यात जाणाºया गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे.देशातील वेगवेगळ्या भागातून २०० वातानुकूलित आणि सामान्य श्रेणीच्या ट्रेन धावतील. सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून देशभरात फेºया होतील. या गाड्यांना वातानुकूलित, विना वातानुकूलित, द्वितीय श्रेणीचे डबे असतील. ‘कन्फर्म्ड’ तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतील. प्रवाशांना गाडीच्या वेळेच्या दीड तास आधी स्टेशनवर जावे लागेल. ‘थर्मल स्क्रीनिंग’ केले जाईल. कोरोनाची लक्षणे दिसणार नाहीत त्यांनाच प्रवास करता येईल. गाड्यांमध्ये अंथरूण-पांघरूण, जेवण, चहा वगैरे काहीही उपलब्ध नसेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासह या ट्रेनमध्ये फक्त ११ श्रेणीतील रुग्णांना आणि ४ श्रेणीतील दिव्यांगांना आरक्षित आसनाची व्यवस्था असेल. रेल्वे स्थानकावर वैद्यकीय दुकान, मल्टी पर्प्स दुकान, पुस्तकांची दुकाने सुरू राहतील, अशी माहितीही रेल्वेकडून देण्यात आली.
तीन तासांत दोन लाख रेल्वे तिकिटे आरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 2:38 AM