मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्क सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्याची मुभा होती. त्यामध्ये गेल्या आठवड्यात सरसकट महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानुसार सध्या मध्य़, हार्बर मार्गावर एक लाख २० हजार, तर पश्चिम रेल्वेवर ८० हजारांहून अधिक महिला रेल्वे प्रवास करत आहेत.गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याची घोषणा केली. वैध तिकिटासह महिलांना रेल्वे प्रवास करता येताे. त्यांना क्यूआर कोडची आवश्यकता नाही. महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यापूर्वी पश्चिम रेल्वेतून सरासरी ३ लाख ५० प्रवासी प्रवास करत होते. महिलांना मुभा मिळाल्यानंतर हा आकडा ४.३० लाखांपर्यंत पोहोचला. तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेतून सरासरी २ लाख कर्मचारी प्रवास करत होते, तो आकडा आता ३ लाख २० झाला. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कसह सर्व नियमांचे प्रवाशांना पालन करणे बंधनकारक आहे.
काेराेनाकाळातही लोकलमधून रोज दोन लाख महिलांचा प्रवास, सर्व महिलांना मुभा मिळाल्याने प्रवासीसंख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 6:32 AM