मुंबई : दोन कमेलियोन (रंग बदलणारा सरडा), एक घोरपड आणि तीन भारतीय अजगरांची मुंबईतील विविध परिसरातून सुटका करण्यात आली. अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी, मुंबई (पॉज-मुंबई)च्या स्वयंसेवकांनी या प्राण्यांना जीवनदान दिले आहे.
मुलुंड येथे एका घराशेजारी रहिवाशांना एक कमेलियोन (रंग बदलणारा सरडा) निदर्शनास आला. त्यांनी त्वरित एसीएफ पॉज संस्थेला संपर्क साधला. यावेळी स्वयंसेवक हसमुख वळंजू तातडीने घटनास्थळी पोहोचले व सरड्याला वाचविले. यानंतर भांडुप येथे एका घराशेजारी असणाऱ्या झाडावर कमेलियोन निदर्शनास आला व त्याला काही कावळे टोचत असल्याचे रहिवाशांनी पाहिले. याची माहिती मिळताच स्वयंसेवक निशा कुंजू आणि हितेश यादव हे घटनास्थळी पोहोचले व त्या सरड्याला वाचविले. बोरीवली येथे एका घरातून एका घोरपडीची सुटका करण्यात आली. तसेच बोरीवलीत एका घराच्या आवारामधून दोन अजगरांची सुटका करण्यात आली. तर मीरा रोड येथून एका अजगराची सुटका करण्यात आली. सर्पमित्र सिद्धेश ठावरे आणि अभिजीत सावंत यांनी या अजगरांची सुटका केली.वाचविलेल्या सर्व वन्यजीवांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. मनीष पिंगळे आणि डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे तपासणीसाठी नेण्यात आले. सदर वन्यजीव सुदृढ असून वनविभागाला माहिती देऊन त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आल्याची माहिती वन्यजीव रक्षक आणि एसीएफ पॉज-मुंबईचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी दिली.