दोन मुख्य सूत्रधारांना अटक
By admin | Published: April 24, 2016 03:13 AM2016-04-24T03:13:20+5:302016-04-24T03:13:20+5:30
देवनारमधील डम्पिंग ग्राउंडला लावण्यात आलेल्या आगीप्रकरणी दोघा मुख्य आरोपींना अटक करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. रफिक खान व अतिक खान अशी त्यांची नावे
मुंबई: देवनारमधील डम्पिंग ग्राउंडला लावण्यात आलेल्या आगीप्रकरणी दोघा मुख्य आरोपींना अटक करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. रफिक खान व अतिक खान अशी त्यांची नावे असून, ते भंगाराचे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडून लहान मुले व गर्दुल्ल्यांना आग लावण्यासाठी आमिष दाखविण्यात आले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. या प्रकरणी आतापर्यंत गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडला २९ जानेवारी आणि २० मार्च रोजी आग लागली होती. त्यामुळे घाटकोपर आणि चेंबूरसह संपूर्ण मुंबईत धुराचे लोट पसरल्याने अनेकांना श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. रहिवाशांसह सर्वच राजकीय पक्षांनी डम्पिंगच्या आगीचा मुद्दा लावून धरल्यानंतर महापालिकेने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमागे अवैधरीत्या भंगार विक्रीचा व्यवसाय करणारे कारणीभूत आहेत. याबाबत ठोस पुरावे शिवाजीनगर पोलिसांच्या हाती लागताच, त्यांनी १५ फेब्रुवारीला यामध्ये ९ भंगार व्यापाऱ्यांना अटक केली. त्यानंतर, दोन दिवसांतच पोलिसांनी आणखी चार व त्यानंतर दोन जणांना अटक केली.
रफिक खान व अतिक खान या भंगार व्यापाऱ्यांची नावे पुढे आली. डम्पिंगमधून जमा झालेले भंगार पहिल्यांदा छोट्या भंगार व्यापाऱ्यांकडे जात होते. त्यानंतर, हे भंगार हे दोघे विकत घेत होते. लहान मुलांना आणि इतर काही गर्दुल्ल्यांना हेच व्यापारी भंगारासाठी देवनारमध्ये आग लावण्यासाठी सांगत असल्याची माहिती काही मुलांनी पोलीस जबाबात दिली आहे. त्यानुसार, रफिकला शिवाजीनगर तर अतिकला नवी मुंबईतून आज पहाटे पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. (प्रतिनिधी)
अटक केलेले हे सर्व व्यापारी याच परिसरातील आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हाच व्यवसाय आहे. मात्र, कचऱ्याच्या नावाखाली या ठिकाणी पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी, तसेच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्यावरदेखील कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी काही स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.