Join us

रमेश कदमसह दोन एमडी फरार

By admin | Published: August 05, 2015 2:17 AM

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील आमदार रमेश कदम

यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील आमदार रमेश कदम तब्बल १५ दिवसांपासून फरारी आहे. महामंडळाचे दोन माजी महाव्यवस्थापकही पसार झाले असून, सीआयडीला कोणालाही पकडता आलेले नाही. ३८५ कोटी रुपयांपैकी तब्बल १४७ कोटी रुपयांची रक्कम कदमने स्वत: गिळंकृत केल्याची बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या साठे महामंडळातील घोटाळ्याच्या अनेक सुरस कथा समोर येत आहेत. आ. कदम आणि इतर सात जणांवर १८ जुलै रोजी मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कदमने सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. पोलीस वा सीआयडीने त्याला त्याचवेळी अटक का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरीच आहे. महामंडळाच्या घोटाळ्यांमध्ये सामील असलेले माजी महाव्यवस्थापक संतोष इंगळे आणि निलंबित महाव्यवस्थापक एस.के. बावणे हेही अद्याप सीआयडीच्या हातावर तुरी देऊन फिरत आहेत. ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात १४७ कोटी रुपये कदमने निव्वळ स्वत:च्या फायद्यासाठी घेतल्याचे सीआयडीच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. उर्वरित रकमेत त्याच्यासह अनेक लाभार्थी असून, त्यात मातंग समाजाचे काही प्रतिष्ठित नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी मंत्री, आमदार, माजी आमदारांचा समावेश आहे. कदम महामंडळाचा अध्यक्ष असताना त्याने बोरीवली; मुंबईत मुख्यालय असलेल्या जोशाबा मध्यवर्ती ग्राहक संस्थेला ४१ कोटी रुपये महामंडळाकडून दिले. त्यातून २ कोटी रुपयांचा एक फ्लॅट कदमने त्याची पत्नी प्रतिभाच्या नावावर खरेदी केला. जोशाबा संस्थेच्या इंडियन बँकेच्या खात्यातून ११ कोटी ५० लाख रुपये औरंगाबादचा पवनसिंग कोहली आणि त्याची आई तेजिंदर कोहली यांना आरटीजीएसद्वारे देऊन बीड बायपास; औरंगाबाद येथे ६२ गुंठे जागा स्वत:च्या नावावर खरेदी केली. जोशाबा संस्थेच्या इंडियन बँकेच्या खात्यातून कदमने आपल्या मालकीच्या संतोषी सिव्हील सर्व्हिसेस या कंपनीच्या बँक आॅफ इंडियातील खात्यात १० कोटी रुपये वळते केले. नंतर हे पैसे आरटीजीएसद्वारे इंडियन बँकेतील आपल्या वैयक्तिक खात्यात वळते केले. याशिवाय, जोशाबा संस्थेच्या इंडियन बँकेतील खात्यातून ५ कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळविले. असे एकूण १५ कोटी रुपये वळविले.400टेम्पोंचे वाटप महामंडळामार्फत मातंग बांधवांना करण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी १० कोटी रुपये हे महामंडळाच्या इंडियन बँकेच्या खात्यातून जोशाबा संस्थेच्या खात्यात वळविण्यात आले. संस्थेचा सचिव विजय कसबे याने बनावट कागदपत्रे सादर करून महामंडळाची फसवणूक केली. कसबे आता गजाआड आहे. उर्वरित अडीच कोटी रुपयांचा हिशेब लागत नाही. पैठण, जि. औरंगाबाद येथील नियोजित अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीला महामंडळाच्या बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या खात्यातून ५८ कोटी ६५ लाख ३० हजार रुपये वळविण्यात आले. त्यावर १ कोटी १२ लाख ८० हजार रुपये व्याज मिळाल्याने एकूण रक्कम ५९ कोटी ७८ लाख १० हजार रुपये झाले. या सूतगिरणीचा अध्यक्ष स्वत: रमेश कदमच. या पैशांतून सूतगिरणीसाठी जागा घेणे, कारखाना उभा करणे, यंत्रसामग्री घेणे आवश्यक होते. त्याऐवजी कदम संचालक असलेल्या कोमराल रिएल्टी प्रा. लि. कंपनीस ही संपूर्ण रक्कम देण्यात आली. कंपनीच्या कॅनरा बँकेतील खात्यात हा पैसा जमा करण्यात आला.