Join us

भिवंडीत खड्ड्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, अकस्मित मृत्यूची नोंद

By नितीन पंडित | Published: July 29, 2023 10:17 PM

शनिवारी सायंकाळी पोगाव-डोंगरपाडा परिसरात घडली घटना

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पोगाव-डोंगरपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अली शेख वय १७ वर्ष व सानीब अंसारी वय १६ वर्ष असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. अली व सानीब हे दोघेही शांतीनगर परिसरात राहणारे होते.ते आपल्या इतर तीन मित्रांसह पोगाव डोंगरपाडा येथे खड्ड्यांमध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी शेजारील नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले.मात्र तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत.या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या ठिकाणी नेहमीच पाण्यात बुडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन आणखी किती मुलांचा जीव जाताना पाहणार असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :भिवंडी