मुख्य हल्लेखोर दिपू तिवारीचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन हल्लेखोरांची सुटका करण्यात आली. भाजपच्या आयटी सेलचा कार्यकर्ता तसेच मुख्य हल्लेखोर दीपू तिवारी अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हिरानंदानी येथील गॅलरीया सर्कलजवळ सोमवारी दुपारी खैरमोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यावर दीपू आणि त्याच्यासोबत ट्रिपल सीट बसणाऱ्या दोघांनी हल्ला केला. ज्यात त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना मुका मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना सोमवारी संध्याकाळी उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दळवी यांनी सांगितले.
दीपूसोबत जे अन्य दोन हल्लेखोर होते ते अल्पवयीन असल्याने त्यांच्या घरच्यांना पोलीस ठाण्यात बोलावून याबाबत समज देत सोडून देण्यात आले. दीपूचा शोध सुरू आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पोलीस वर्तुळात जोर धरत आहे.
सोमवारी एका वृद्धेच्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर या दीपू व त्याच्या सहकाऱ्यांनी तिच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी रत्यात जमलेल्या गर्दीला पांगवून या तिघांना पोलीस ठाण्यात आणत असताना त्यांनी दोन पोलिसांवर हल्ला केला होता.
.....................