भाजपा- मनसे युतीने उघडले खाते; मनसेचे दोन उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 07:45 PM2020-01-08T19:45:34+5:302020-01-08T19:56:23+5:30
भाजपा आणि मनसे युतीचा पहिला विजय झाला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी पालघरमधील वाडा तालुकाच्या पंचायत समितीत भाजपा आणि मनसेने युती केली होती. यामध्ये मनसेच्या दोन उमेदवारांचा विजय झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपा आणि मनसे युतीचा हा पहिला विजय झाला आहे.
पालघरमधील वाडा मतदारसंघामध्ये भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो असल्याचे समोर आले होते. या बॅनरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजपा आणि मनसेने युती केली असल्याची माहिती भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती.
पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले असून यामध्ये गण- मन मतदार संघातून मनसेचे उमेदवार योगेश पाटील 2000 मतांनी, तर वाडा मतदारसंघातून कार्तिकी ठाकरे 1200 मतांनी विजयी झाल्याने मनसे- भाजपा युतीमध्ये मनसेने पहिल्यांदा पालघर पंचायत समितीमध्ये खातं उघडलं आहे. त्यामुळे आता भाजपा आणि मनसे यांच्यात आणखी जवळीक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. तसेच मनसेचे संदीप देशपांडे यांनी देखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली केली होती भाजपा पक्षावर नाही असं मत व्यक्त केलं होतं.
दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.
मनसे, भाजपाची युती होणार?; राजू पाटील यांनी केलं मोठं विधान
भाजपा-मनसे संभाव्य युतीवर शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया; काँग्रेस-राष्ट्रवादीची सावध भूमिका
राज-फडणवीस भेटीवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे नवे राजकीय संकेत; म्हणाले की...