केईएम रुग्णालयात झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये दोन महिन्याचे बाळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 09:31 PM2019-11-07T21:31:53+5:302019-11-07T21:34:34+5:30
१५ ते २० टक्के भाजल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
मुंबई - केईएम रुग्णालयात बुधवारी रात्री बाल अतिदक्षता विभागात ईसीजी यंत्रामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दोन महिन्याचे बाळ जखमी झाले आहे, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली. या घटनेत दोन महिन्याचे बाळ जखमी झाले असून १५ ते २० टक्के भाजल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
या घटनेविषयी अधिक माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाले की, गुरुवारी रात्री बालअतिदक्षता विभागात ही घटना घडली. ईसीजी यंत्रांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, त्यात गादीने पेट घेतला. ही आग कुठल्याही यंत्रामुळे झाली नसून वायर्समध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे तेथील दोन महिन्याच्या बाळाच्या डाव्या हाताला आणि डोक्याच्या काही भागाला भाजले आहे. याचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. त्या बाळाची प्रकृती आता स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे बाळ वाराणसी येथून घटनेच्या एक दिवसापूर्वी केईएम रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात दाखल झाले. या बाळाला छातीत संसर्ग झाला असून त्याला श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याच्या समस्येवर उपचार सुरु आहेत.