हँकॉक पुलाच्या कामाला दोन महिन्यांनंतरचा मुहूर्त
By admin | Published: August 20, 2016 05:07 AM2016-08-20T05:07:54+5:302016-08-20T05:07:54+5:30
सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असा हँकॉक पूल पाडण्यात आल्यानंतर स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. सात महिने उलटूनही हा पूल उभारला जाण्याची
मुंबई : सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना असा हँकॉक पूल पाडण्यात आल्यानंतर स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. सात महिने उलटूनही हा पूल उभारला जाण्याची प्रतीक्षाच होत आहे. त्यामुळे तो त्वरित बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिका व रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. पालिकेकडून नव्याने हँकॉक पूल बांधण्यात येणार असून, आता त्याला दोन महिन्यांनंतरचा मुहूर्त देण्यात आला आहे. तोपर्यंत नवीन निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण केली जाणार आहे.
हँकॉक पूल जुना आणि धोकादायक झाला होता. तसेच ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंचीही कमी असल्याने मध्य रेल्वेवरील गाड्यांना भायखळा व सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान वेगमर्यादा घालण्यात आली होती. या पुलावर पालिकेकडून १८ नोव्हेंबर २०१५ पासून हातोडा चालविण्यात आला आणि हँकॉक पूल वाहने आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर येणाऱ्या या पुलाचा महत्त्वाचा भाग २०१६च्या जानेवारी महिन्यात ब्लॉक घेऊन तोडण्यात आला. पूल तोडल्यामुळे स्थानिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी सुरुवातीला निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र काळ्या यादीतील कंत्राटदारांना हे काम पालिकेने दिल्याचे समोर येताच त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर येणारा हा पूल बांधण्यासाठी सात महिने उलटूनही हालचाली होत नसल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) ओ. कोरी यांनी सांगितले की, दोन महिन्यांत ते काम पूर्ण होईल आणि त्यानंतरच काम सुरू होईल. हा पूल बांधण्यासाठी वेगळे साहित्यही वापरण्यात येईल. (प्रतिनिधी)
पर्यायी पादचारी पुलाचीही प्रतीक्षा
दुरुस्ती होईपर्यंत जा-ये करण्यासाठी पर्यायी पूल उपलब्ध करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका येथील कमलाकर शेनॉय यांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत महापालिकेने सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पूल बांधणे शक्य आहे, असे उच्च न्यायालयाला सांगितले आहे. तर पश्चिम रेल्वेने या ठिकाणी पादचारी पूल बांधणे शक्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे याबाबत मत मागवले.
मात्र राज्य सरकारनेही पश्चिम रेल्वेच्या म्हणण्याला दुजोरा दिला. सॅण्डहर्स्ट रोडजवळ पादचारी पूल बांधल्यास स्थानिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले. तथापि, अशा स्थितीत संरक्षण दलाचे अभियंते मार्ग काढू शकतात, असेही राज्य सरकारने म्हटले. त्यामुळे उच्च न्यायालयाने संरक्षण दलालाच या याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या आठवड्यात आहे.
नवीन पूल झाल्यास मिळणारे फायदे
कमी उंचीच्या धोकादायक पुलामुळे सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाच्या आसपास ताशी ३० किमी वेगमर्यादा लादण्यात आली होती. ही वेगमर्यादा हटवून ताशी ५० किमी केल्याने रेल्वेचा वेग वाढण्यास मदत मिळाली आहे.
पुलाचे खांब काढून टाकण्यात आल्यानंतर नवीन पुलाजवळील ट्रॅकची उंची वाढवण्यात येईल. त्यामुळे या ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचणार नसल्याचा दावा रेल्वे अधिकारी करतात. नव्या पुलाची उंचीही वाढवण्यात येणार आहे. सध्याच्या पुलाची उंची ४.९ मीटर एवढी होती आणि आता ती ६.५२५ एवढी करण्यात येईल.
ओव्हरहेड वायर आणि पेन्टाग्राफमध्ये तांत्रिक समस्या उद्भवणार नाही, जुन्या पुलाची रुंदी ही ६० मीटर एवढी होती. नवीन पूल बांधताना रुंदी वाढवण्यात येणार असून, ती जवळपास ९0 मीटर एवढी केली जाईल.