दोन महिन्यांत रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 04:06 AM2016-09-17T04:06:48+5:302016-09-17T04:06:48+5:30

राज्यात जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली असून नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी ही संख्या जास्त असल्याचे आढळून आले

In two months the patient grew | दोन महिन्यांत रुग्ण वाढले

दोन महिन्यांत रुग्ण वाढले

Next

मुंबई : राज्यात जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली असून नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी ही संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. विविध चाचण्यांसाठी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणाऱ्या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आजारांच्या सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी साथरोग नियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी आरोग्यमंत्री बोलत होते. मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ४७ टक्के घट झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २,५८२ असून, त्यात शहरी भागात १,६८२ तर ग्रामीण भागात ९०० रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत १२२ रुग्ण आहेत. डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आणि डेंग्यूसदृश रुग्ण यामध्ये तफावत आहे. डेंग्यूसदृश रुग्णदेखील डेंग्यूचे रुग्ण म्हणून जाहीर करू नका, असे आवाहन खासगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अकारण घबराट निर्माण होऊ शकते, असे डॉ. सावंत म्हणाले.
आयजीएम अ‍ॅन्टीबॉडीजची चाचणी सात दिवसांमध्ये पॉझिटिव्ह आली तरच तो रुग्ण डेंग्यूचा म्हणून जाहीर करणे योग्य राहील, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. डेंग्यूवरील औषधांचा साठा राज्यात पुरेसा असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डेंग्यूसाठीच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा जास्तीचे दर आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
राज्यात चिकनगुनियाचे ४३९ रुग्ण असून, त्यातील ९० टक्के रुग्ण हे पुणे शहर व ग्रामीण भागात आहेत. पुणे शहरातील ठरावीक भागातच रुग्ण आहेत. चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त का आहे, याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या संस्थेस अभ्यास करायला सांगण्यात आले आहे. ज्या भागात चिकनगुनियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले आहेत तेथे पुणे महापालिकेने स्वच्छता आणि बांधकाम सुरू असलेल्या जागांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केल्या.
राज्यात आॅगस्टअखेर मलेरियाचे १५ हजार ९२१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३० हजार २२३ एवढी होती. आरोग्य विभागाने मलेरियाप्रतिबंधक मोहीम हाती घेतल्याने या वर्षी मलेरिया रुग्णांच्या संख्येत ४७ टक्के घट झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले.

पावसाळ््यात वाढणाऱ्या साथीच्या आजारांचा फायदा अनेक बेकायदा लॅब घेतात. सर्वसाधारणपणे पावसाळ््यात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मलेरिया, डेंग्यूच्या तपासण्या महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतही होतात. पण, खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये या तपासण्यांसाठी जास्त शुल्क आकारले जाते.

साथीच्या आजारांत वाढ झाल्यावर अनेकदा रुग्ण खासगी लॅबमध्ये तपासण्या करून घेतात. यावेळी त्यांची फसवणूक होण्याचा धोका असतो. कारण, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या तपासण्यांसाठी अधिक शुल्क आकारले जाते. पण, अशाप्रकारे अधिक पैसे आकारले गेल्यास त्या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी दिले आहेत.

Web Title: In two months the patient grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.